राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा आज दुपारी १२ वाजता शपथविधी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्री पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ  मनीषा कायंदेहे आज शपथ घेणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा (विधान परिषद) गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. आज दुपारी निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्या अगोदरच या सात आमदारांचा शपथविधी उरकला जाणार आहे

राज्यपालनियुक्त १२ आमदारांपैकी सात जणांच्या नावांची मंत्रिमंडळाने शिफारस केली असून त्यांच्या नावांची यादी मान्यतेसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपच्या तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) दोन आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन सदस्यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज आणि सांगलीतील इद्रीस नायकवडी यांची नावे अजित पवार गटातून आघाडीवर आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू महाराज राठोड तसेच शिवसेनेने मनीषा कायंदे व हेमंत पाटील यांची नावे आहेत. आज दुपारी १२ वाजता या सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी होणार असून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ देणार आहेत.