नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीपासून लागणार याबाबतची चर्चा सुरु असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
१० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार असून आजच आचारसंहिता लागली जाऊ शकते.
