महाडीबीटी अंतर्गत देत असलेल्या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा..

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने जमा करू, मात्र या शिष्यवृत्तीमध्ये काही बोगस प्रकार असून त्याची चौकशी करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांना दिली. त्याचवेळी यामध्ये महाडीबीटी कडून मिळालेल्या माहितीनुसार ८७९ कोटींची तफावत असून शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाला असल्याची तक्रार सौरभ शेट्टी यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. याची रितसर चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने द्या, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर येथे सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे महा डी. बी. टी. अंतर्गत येणारी शिष्यवृत्ती ३२८० कोटी रूपये इतकी थकीत आहे. या शिष्यवृत्ती वेळेवर मिळाल्या नसल्यामुळे विद्याथीं त्रस्त आहेत. यामध्ये तफावत असून ८७९ कोटींचा घोटाळा दिसून येत आहे. खासगी संस्था शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे महत्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याने विद्यार्थ्यांना कर्ज काढून फी भरावी लागत आहे. अशा पद्धतीने जर सरकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना होत नाही तर यावर त्वरित आपण लक्ष घालावे. संपूर्ण महाराष्ट्रात ३२८० कोटी पेक्षा जास्त शिष्यवृत्ती थकीत आहे. शिक्षण आज काळाची गरज आहे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्याशिक्षणामध्ये अडथळे येत आहेत. राष्ट्राचा विकास करत असताना सर्वात मोठा पाया म्हणजे शिक्षण आणि हेच शिक्षण विद्यार्थ्याना योग्य पद्बतीने जर मिळत नसेल तर कीदेशोन्नतीसाठी या गोष्टीचे गांभीर्य आपण समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या या समस्याबद्दल आपण स्वतः लक्ष देऊन शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी केली. यावेळी सौरभ शेट्टी, अण्णा सुतार, कैलास पैमाजे, वृषभ मादनाईक, प्रतीक धड्डे, संदीप शेटाने हे उपस्थित होते.