अवघी जयसिंगपूर नगरी शिवमय; छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन.

कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी दुपारी ३ वाजता नांदणी नाका येथे उत्साहात आगमन झाले.या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी राजेंद्र पाटील यड्रावकर व खासदार धैर्यशील मानेयांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुतळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. पुतळ्याचे विधिवत पूजन माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले.

 

पुतळ्याच्या आगमनानंतर जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीदरम्यान शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर झाले, तसेच पारंपारिक वाद्यांचा गजर करीत वातावरणात उत्साह भरला.संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गांवरून पुतळ्याची मिरवणूक नेण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण जयसिंगपूर शहर शिवमय झाले.

शहरातील नागरिकांनी संपूर्ण शहरात रांगोळीचा सडा काढून पुष्पवृष्टी करून शिवरायांच्या पुतळ्याचे स्वागत केले.विशेषत: शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. गेल्या पाच दशकांपासून जयसिंगपूर शहरात शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने शिवप्रेमी नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पुतळा कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभारण्यात येणार असून,त्याच ठिकाणी शिवकालीन साहित्याचे संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे या पुतळ्याच्या स्थापनेमुळे केवळ ऐतिहासिक अभिमान नव्हे,तर सांस्कृतिक विकासाचे केंद्रही उभारले जाणार आहे.

जयसिंगपूरच्या इतिहासात या पुतळ्याच्या स्थापनेचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी देणारा ठरला. या मिरवणुकीत संपूर्ण शिरोळ तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

 

.