जनता दरबार मधून नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत असताना त्यांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये म्हणून जनता दरबार घेण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापर्यंत १० जनता दरबार जिल्ह्यात आयोजित केले. मागील ९ जनता दरबारांमध्ये २४३३ अर्ज दाखल झाले, यातील २३६२ अर्ज निकाली काढण्यात आले. नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेवटचा १० वा. जनता दरबार संपन्न झाला. यावेळी महसूल, पोलिस, महानगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयांमधील विभागांबाबत आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली. संबंधित सर्व अर्ज लवकरात लवकर निर्गत करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कामांचेही त्यांनी कौतुक केले व केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, जर कोणाचे नकळत मन दुखावले असेल तर राग मनात धरून बसू नका. सर्वसामान्यांसाठी आपण सर्वजन मिळून काम केले आहे.

 

 

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक संचालक नगर रचना विनय झगडे यांचेसह सर्व विभाग प्रमुख, अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.

सकाळी दीपप्रज्वलनाने जनता दरबारची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या स्विकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करण्याबाबत सूचनाही केल्या. या जनता दरबारामधे २७० अर्ज दाखल झाले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जर एखाद्याचे काम होत नसेल तर त्यांना काम होणार नाही याची माहिती द्या. का काम होत नाही याचे उत्तर नियम, कायदे संदर्भ टाकून लेखी पद्धतीने द्यावे. अन्यथा काम तातडीने पूर्ण करावे. जास्त तक्रारी असलेले विभाग यात नगर रचना, महसूल, पोलिस, महापालिका अशा विभागांनी लक्ष घालून कार्यवाही करावी.

मागील ९ जनता दरबारमधील प्राप्त २४३३ अर्जांमधील २३६२ अर्ज निर्गत

दि. ४ सप्टेंबर २०२३ पासून झालेल्या ९ जनता दरबार मधील दाखल झालेल्या २४३३ अर्जांमधील २३६२ अर्ज निकाली निघाले असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यात महसूल विभागाकडे ९६४ पैकी ९४० निकाली काढण्यात आले. इतर जिल्हा विभाग १४६९ पैकी १४२२ अर्ज निकाली काढले. यातील ७१ अर्ज अद्याप निकाली काढणे प्रलंबित आहे. तसेच १० व्या जनता दरबारमधील आलेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले.