गडहिंग्लजचे स्पर्धा परीक्षा केंद्र दिशादर्शक ठरेल :हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : साधना एज्युकेशन सोसायटी गडहिंग्लज यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सहकार्यातून साकारणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. येथे जिल्ह्यातील दुसरे शासकीय सहकार्यातून उभे राहत असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र इतके समृद्ध बनवा की संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा ओढा या केंद्राकडे लागला पाहिजे. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 

 

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले कि, सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभे राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे दुसरे शासकीय अभ्यास स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. या अभ्यास केंद्राचा उपयोग सर्वसामान्य गरीब घराण्यातील मुला- मुलींना होणार आहे. त्यामुळे या केंद्राकडे विशेष लक्ष साधना एज्युकेशन सोसायटीने द्यावे, आणि हे एक असे केंद्र बनवावे की या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी आयएएस आयपीएस इथेच होणार..!अशी भावना त्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. जेणेकरून पुण्याच्या दिशेने जाणारा विद्यार्थ्यांचा ओढा हा गड इंगळेच्या दिशेने वळला पाहिजे. आज बिहार, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश मध्ये अधिकारी ज्यादा होत आहेत. याचे कारण जेव्हा आपण शोधतो तेव्हा ज्या ठिकाणी गरिबी, दारिद्र्य आहे. अशा ठिकाणीच शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी पुढे येतात.

‘साधना’चे सीईओ एम. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, ‘साधना’च्या संचालिका फिलॉन बारदेस्कर, किरण कदम, सुरेश कोळकी, वसंतराव यमगेकर, हेमंत कोलेकर, डॉ. पाटणे, सिद्धार्थ बने आदी उपस्थित होते. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.