जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या नोंदी घ्या. किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कोल्हापूर (सौरभ पाटील)

जिल्ह्यामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या नोंदी घ्याव्यात या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पणन विभागाने 25 सप्टेंबरला एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदीचा आदेश दिला आहे. त्यानुसार दिनांक 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदी करायचे आहेत तर दिनांक 15 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. परंतु या नोंदी कुठे व कशा करायच्या याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

 

बाजारामध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा रु.500 ते 1000 ने कमी आहेत. मुळातच यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत घट झालेली आहे. त्यातच सततच्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन मध्ये ओलावाचे (moisture) प्रमाण वाढले आहे. याचा गैरफायदा घेऊन खाजगी व्यापारी हमीभावापेक्षा फारच कमी दराने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्याची लूट करत आहेत.
मुळात शासकीय खरेदीची घोषणा होऊन आठ नऊ दिवस झाले तरी त्याबाबत यंत्रणा नसल्याने तसेच त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोचल्याने शेतकरी खाजगी व्यापाराला कमी दरामध्ये सोयाबीन विकत आहेत.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीची केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत आणि त्यासाठीच्या नोंदी कृषी सेवक आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावेत अशी मागणी किसान सभेने केली. माननीय जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती घेऊन निर्णय घेवू असे आश्वासन दिली. किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकण्याची गडबड न करता हमी भावाने शासकीय खरेदी केंद्रावर नोंदी करून ते विकावे. यासाठी किसान सभा पाठपुरावा करीत आहे. शेतकऱ्यांनी किसान सभेशी संपर्क साधावा.

शिष्टमंडळामध्ये आप्पा परीट, लक्ष्मण पाच्छापुरे, बसगोंद पाटील ,एन वाय जाधव, अमोल नाईक, चंद्रकांत कांबळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा समावेश होता