अजित पवारांची अमित शहांकडे विधानसभा निवडणुकीसाठी जादा जागांची मागणी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सह्याद्री अतिगृहात भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीमध्ये जादा जागा सोडण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली. त्यामुळे विधानसभेसाठी जादा जागा सोडण्यास भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस कडे सक्षम उमेदवार आहेत. त्या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी त्यांना तिकीट देणे आवश्यक आहे. सक्षम उमेदवार आणि जिंकण्याच्या निकषावर तिकीट वाटप करावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहा यांना सांगितले. दरम्यान येत्या दोन दिवसात जागा वाटपावर निर्णय घेऊन पहिली यादी प्रसिद्ध करण्याची तयारी करण्यात आली आहे.