मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा कोल्हापुरात राज्यस्तरीय शुभारंभ

कोल्हापूर : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडीओ संदेशामधून केले. त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला.

 

यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. यावेळी सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी, विभागीस उप आयुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त दिपक घाटे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, संशोधन अधिकारी संभाजी पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले, तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी, आई अंबाबाईच्या करवीर येथून होतो आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी प्रणाम करून सामाजिक क्रांतिचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे आयोध्येसाठी रवाना होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर साकारलयं. प्रभू रामांचं दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.