महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत सखी वन स्टॅाप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. २६) विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विध्यार्थ्यांकरिता ‘महिला सुरक्षितता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, महिलांच्या संदर्भात गुन्हे का घडतात, त्याची कारणे काय आहेत, या बाबींचा मनोकायिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध घालण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार केला जातो. समाजात खुलेपणाने वावरण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी यांनी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना व कायद्यांची माहिती दिली. करवीरचे संरक्षण अधिकारी विनायक चौगुले यांनी घरगुती हिंसाचार आणि त्यासंबंधित कायदे यांची माहिती दिली. भारत साळुंखे यांनी महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हेगारीविषयी माहिती दिली. अॅड. गौरी पाटील यांनी स्त्रीभ्रूण हत्येची कारणे व  पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याच्या अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. नीलम धनावडे यांनी सखी वन स्टॉपबाबत माहिती दिली.

बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक केले. मयुरेश पाटील यांनी आभार मानले. उज्ज्वला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेस विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील ४००हून अधिक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.