वीस लाखांसाठी मित्राचे अपहरण ;गडहिंग्लज येथील घटना

गडहिंग्लज: मित्राच्या अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून २० लाखांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महिलेसह सात जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार दिनकर गायकवाड( रा. हनमंतवाडी ता. गडहिंग्लज), सुनिता प्रकाश पाटील( बाळेघोल, ता.कागल), वीरेंद्र संजय जाधव( मूळ रा. राशिंग,ता.हुक्केरी,सध्या राहणार गडहिंग्लज) यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य अज्ञात चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी, योगेश हरी साळुंखे (वय 34, मुळ गाव हसूर खुर्द ता. कागल सध्या रा. गडहिंग्लज) आणि कागल तालुक्यातील बाळेघोड येथील ओंकार व सुनीता हे एकमेकांचे मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी ओंकार व सुनीता यांनी जेवायला जाऊया असे सांगून योगेशला कारमधून घेऊन गेले. तिघेही तळवंती रोडवरील बहिरेवाडी येथील हॉटेल मध्ये जेवण केले. त्या ठिकाणी पोहोचतात वॉशरूमला जाऊन येतो असे सांगून ओंकार व सुनीता हे दोघे हॉटेलच्या मागे गेले. हॉटेल समोर आलेल्या अज्ञात पाच जणांनी योगेशला त्याच्याच कार मध्ये घालून गोकुळ शिरगावला नेलं. दरम्यान कमर पट्ट्याने मारहाण करून त्याची चार तोळ्याची सोनसाखळी व हातातील दीड तोळ्याची अंगठी काढून घेतली. वीस लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यादरम्यान योगशने पत्नीला मोबाईल वरून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पत्नीने  गडहिंग्लज पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली. गडहिंग्लज पोलिसांनी संस्थेच्या मोबाईलचे लोकेशन काढून गोकुळ शिरगाव पोलिसांच्या सहकार्याने योगेशची सुटका केली.