सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युवकांने पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात युवकाच्या पत्नीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गणपत थेटे (रा.गिरणारे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुल याचा 2021 मध्ये भगूर येथील पल्लवी नंदू हरक हिच्या सोबत विवाह झाला होता. विवाह नंतर पल्लवी राहुल व सासू सरिता यांना शिवीगाळ करीत वाद घालत होती. तसेच राहूलला मारहाण करीत माहेरी निघून जात होती. जिवाचे काहीतरी बरे वाईट करीन अशी धमकी ती राहुलला देत होती. तसेच राहुलच्या सासरकडचे लोक दमदाटी करत असल्याचा आरोप सरिता यांनी केला. 15 सप्टेंबरला राहुल व पल्लवीत वाद झाला होता. त्यावेळी पल्लवीने राहुलला मारहाण करून शिवीगाळ केली होती. त्यादिवशी तिने स्वयंपाक सुद्धा केलेला नव्हता. या त्रासाला कंटाळून राहूलने राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यामुळे पत्नी पल्लवी, सासरे नंदू रामनाथ हारक, सासू अनिता नंदू हारक, मेव्हणा अंकेश नंदू हारक यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी राहुलने चिठ्ठीत पत्नी व सासरच्या नातलगा विरोधात तक्रार केली आहे. तसेच होणारी शिवीगाळ व मारहाणीचा व्हिडिओ देखील राहुलने काढले. त्यावरून नाशिक तालुका पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.