कोल्हापूर : भादोले( हातकणंगले) येथील अनुराधा ऋषिकेश मदने(20) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.17 )सायंकाळी घडली. याप्रकरणी पति ऋषिकेश बाजीराव मदने (वय22,रा. भादुले) सासु शोभा बाजीराव मदने (वय 45) ननंद पुनम संपत जाधव (वय 32 रा. वाठार तर्फ वडगाव)यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सात महिन्यापूर्वी अनुराधा यांचा विवाह ऋषिकेश मदने यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर दागिने दिले नाही असे म्हणून तिचा पती तिला शिवीगाळ, मारहाण करत होता. यावेळी अनुराधाच्या माहेरच्या लोकांनी त्याला चांदीचे ब्रेसलेट करून दिले. तरी सुद्धा तिला त्रास देणे सुरूच होतं. याबाबत तिने आपल्या माहेरी कळवल्यानंतर तिला माहेरी ( मतकुणकी ता. तासगाव, जि. सांगली) घेऊन गेले यानंतर सासरच्या लोकांनी मध्यस्थीनंतर त्रास देत नाही, असं कबूल करून तिला भादोले गावी आणलं. परंतु त्यानंतर पुन्हा मोटरसायकल घेण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन ये असं म्हणून मारहाण व छळ सुरू केला.
वारंवार होणाऱ्या मारहाणीस कंटाळून तिने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या नंतर संतप्त नातेवाईकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण पती, सासू ,ननंद यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी भादुले येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.