अखेर त्या धोकादायक बंधाऱ्यावर दूचाकी खाली पडली;केवळ दैव बलवत्तर म्हणूनच युवकांचे प्राण वाचले

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे 
मलकापूर येळाने मार्गावरील त्या धोकादायक बंधाऱ्याला संरक्षण कठडे नसल्याने मलकापूरच्या दिशेने येळाणे कडे जात असलेल्या दुचाकी धारकांचा अंदाज चुकला  आणि गाडी सरळ बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहात कोसळली . केवळ दैव बलवत्तर म्हणूनच गाडीवरील दोन युवक बचावले .  अनेक वेळा या ठिकाणी अपघात सदृश्य घटना घडून देखील संबंधित विभागाचे दुर्लक्ष आज दोन युवकांच्या जीवावर बेतलं असतं .या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन आता तरी या ठिकाणी संरक्षण कठडे उभारतील का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्यातून येऊ लागली आहे . पडलेली गाडी काढण्यासाठी कोपार्डे  येथील राजेश माने यांनी विशेष प्रयत्न केले .

 

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कडवे तालुका शाहूवाडी येथील दोन युवक हिरो होंडा स्प्लेंडर या  दूचाकी वरून मलकापूरच्या दिशेने येळाणेकडे निघाले होते . बंधाऱ्याच्या मध्यभागी आल्यानंतर गाडी उभा करत असताना त्यांचा अचानक अंदाज चुकला त्यामुळे गाडीचा तोल प्रवाहाच्या दिशेने गेला . घटनेचे गांभीर्य ओळखत दोन्ही युवकांनी गाडी सोडून दिली क्षणात गाडी पाण्याच्या प्रवाहात कोसळली बंधाऱ्यात गाडी कोसळल्याची माहिती मिळताच बंधाऱ्यावर नागरिकांनी व युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.