मुंबई : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनापासून आभार मानले.
या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किंमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. अस मत अजित पवार यांनी व्यक्त केले.