राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा आयटीआय टीममधील प्रत्येकाचा सन्मान – शिल्प निदेशक विवेक चंदालिया

कोल्हापूर : राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा बहुमान हा माझा एकट्याचा सन्मान नसून आयटीआय संस्था, संस्थेतील अधिकारी-कर्मचारी, सहकारी, निदेशक संघटनेसह आजवरच्या वाटचालीत वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या प्रत्येकाचा तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा सन्मान असून या सर्वांचा मी ऋणी आहे, अशा शब्दात भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील आयटीआयचे निदेशक विवेक चंदालिया यांनी पुरस्कारासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत.

 

 

 

शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील 5 शिक्षकांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील आयटीआय निदेशक विवेक चंदालिया यांनाही पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
दर वर्षी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार तर्फे नॅशनल टिचर्स अवॉर्ड देण्यात येतो. संपूर्ण भारतामधील आयटीआय मधून नऊ कॅटॅगरी मधून म्हणजे बेस्ट ५ ट्रेड कॅटॅगरी इलेक्ट्रीयशन, फिटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक आणि कोपा, प्रत्येकी एक असे पाच पुरस्कार, रिमेनिंग इंजिनियरिंग ट्रेड कॅटॅगरी (यामध्ये किमान ४० व्यवसाय आहेत) त्यापैकी एक पुरस्कार, नॉन इंजिनियरिंग ट्रेड कॅटॅगरी एक पुरस्कार, दिव्यांग गटातून एक पुरस्कार, न्यू एज कॅटॅगरी मधून एक असे ९ पुरस्कार देण्यात येतात.

यापैकी महाराष्ट्रातून एकमेव आयटीआय कोल्हापूर येथील पेंटर जनरल शिल्प निदेशक विवेक चंदालिया यांना रिमेनिंग इंजिनियरिंग ट्रेड कॅटॅगरी म्हणजे भारतातील ४० ते ४५ व्यवसायातील अनेक निदेशकांमधून विवेक चंदालिया यांना २०२४ सालचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या २५ वर्षाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून पेंटिंग आणि स्प्रे पेंटिंग मधून ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारश्रम प्रशिक्षण दिले आहे. शासनाच्या विविध योजना यशस्वीरित्या राबविणे, रांगोळी आणि चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, पेंटर जनरल ट्रेड आणि संस्थेच्या नावलौकीकामध्ये योगदान देणे, पेंटर जनरल ट्रेड अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थ्यांसाठी थेअरी विषयाची मराठी भाषेत पुस्तके प्रकाशित करणे. सुमारे सहा दशकानंतर पहिल्यांदाच पेंटर जनरल भारत सरकार निमि चेन्नई या संस्थेसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेंटर ट्रेडचे ट्रेड प्रॅक्टीकल आणि ट्रेड थेअरी पुस्तके तयार केली आहेत.

त्यांनी भारत स्किल्ससाठी पेंटर जनरल व्यवसायासंबंधीत प्रश्नसंच विकसित करणे, भारत सरकार सोबत पेंटर जनरल ट्रेडचे सुधारीत अभ्यासक्रम विकसीत करण्यात योगदान दिले आहे. तसेच पेंटर ट्रेड उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी शिकाऊ उमेदवारी व नोकरीसाठी विशेष मार्गदर्शन, पेन्टर जनरल उत्तीर्ण महिला प्रशिक्षणार्थींच्या शिकाऊ उमेदवारीसाठी विशेष प्रयत्न केले असून त्यात यश मिळाले आहे. सध्या त्यांची एनजीओ विवेक फौंडेशन कोल्हापूर च्या माध्यमातून कौशल्यज्योत योजनांतर्गत आयटीआय मधील सहकाऱ्यांच्या मदतीने इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतच्या मुलांमुलींना आयटीआय मधील व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रचार व प्रसार करत आहेत. या आधी विवेक चंदालिया यांना शैक्षणिक आणि सामाजिक उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाचा २०१२-१३ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. याच सोबत त्यांना वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उल्लेखनीय कार्यासाठी अनेक सामाजिक संस्थांकडून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिली आहे.

🤙 9921334545