लाच घेतल्या प्रकरणी कोडोली मंंडल अधिकाऱ्यांवर कारवाई

पन्हाळा तालुक्यातील कोडोली मंंडल अधिकारी कार्यालयातील मंडल अधिकारी अभजीत नारायण पवार (रा. रुक्मिणीनगर कोल्हापूर) यांच्यावर पंधरा हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मंडल अधिकारी पवार व रणजित उर्फ आप्पा आनंदराव पाटील (रा. कोडोली) या दोघांवर कारवाई झाली आहे. या दोघांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या काकांनी घेतलेली शेतजमीन सात बारा पत्रकी नोंद करून सात बारा देण्यासाठी रणजित पाटील यांनी वीस हजार रुपये मागितले होते. पाटील यांनी मंडल अधिकारी पवार यांना देण्यासाठी हे पैसे मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले. तडजोडी अंती पंधरा हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम रणजित पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ३१ मे रोजी कारवाई केली आहे.

पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक बापूसो साळुंके हे पुढील तपास करत आहेत.