रोहिणी नक्षत्राला सुरूवात होताच सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सरासरी २५.१ मिलीमीटर इतका पाऊस होताना दुसरीकडे वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून कोसळले. शेतीबागांचे नुकसान झाले. घरांवरील छपरेही उडून गेल्याने अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडले. तर वीज कोसळून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.