वडणगे प्रकरणात गाव बंद नको कायदेशीर मार्ग निवडा

करवीर तालुक्यातील वडणगे येथील सिटी सर्वे नंबर 89 येथील मस्जिद च्या समोरील तर महादेव मंदिर च्या पाठीमागील जागा मुस्लिम समाजाची असल्याचा निकाल उपसंचालक भूमि अभिलेख पुणे कार्यालयाने नुकताच दिला. या निकालाच्या निषेधार्थ येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 मे रोजी वडणगे बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज करवीर पोलिसांनी हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची बैठक घेऊन या निकाला संदर्भात पुढील दिशा कायदेशीर मार्गाने ठरवावी. दोन्ही समाजातील कोणत्याही व्यक्तीने वडणगे बंद अगर तशा प्रकारचे दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. कायदा व सुव्यवस्थेचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे. 


यावेळी बैठकीत बोलताना करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर म्हणाले, सध्या निवडणुकीच्या आचारसंहिता आहेत. पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. संबंधित जागेचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. पुणे उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाने जरी निकाल दिला असला तरी त्या निकालाच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागता येते त्याच दृष्टीने विरोधी पक्षाला अपील करता येते. हा कायदेशीर मार्ग सोडून गाव बंद सारख्या समाजाला वेठीस धरणाऱ्या कृती तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृती बेकायदेशीरपणे करणे बरोबर नाही. अशा बेकायदेशीर कृती केल्यास पोलीस कारवाई करणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी देखील हा मुद्दा दोन समाजातील नात्यासाठी नाजूक आहे. त्याकरता ग्रामपंचायत प्रशासनाने दोन्ही समाजातील ज्येष्ठ- कनिष्ठ व्यक्तींना एकत्र बसवून मार्ग काढणे योग्य होईल. असे सांगून कोणत्याही परिस्थितीत दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होता कामा नये. अन्यथा या प्रकरणी गैरवर्तनाबाबत कडक कारवाईचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याचे सांगितले.

दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामसेवक भगत यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना 2005 सालापासून हा वाद तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील प्रशासन तसेच कोर्टामध्ये चालू असून झालेल्या निकालाबाबत यापुढे ग्रामपंचायतीच्या वतीने जागा ग्रामपंचायतीचीच असल्याबद्दल योग्य ती कागदपत्रे मंत्री महोदय तथा शासन पातळीवर तसेच कोर्टामध्ये योग्य ते पुरावे सादर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य ते प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने पिराजी संकपाळ यांनी यावेळी बोलताना गेल्या वीस वर्षात ग्राम पंचायत प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळेच हा निकाल विरोधात गेल्याचा आरोप प्रशासनावर केला. दरम्यान या प्रकरणाबाबत दोन्ही समाजाशी चर्चा करून तोडगा काढण्याचा व सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे येथील गटप्रमुख बाजीराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच साखरकर तलाठी श्रीकांत नाईक, सतीश पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व हिंदू मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.