घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 46 तास उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे.

आज सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, महापालिका आणि पोलिसांनी पोकलेनच्या साहाय्याने होर्डिंगचा ढिगारा उपसायला सुरुवात केली. गॅस कटरच्या साहाय्याने होर्डिंगचे तुकडे करुन लोखंडी तुकडे बाजूला केले असता तब्बल 18 बाईक्स आणि सहा ते सात कार बाहेर काढण्यात आल्या आहेत. ही परिस्थितीत पाहता होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 40 जण असल्याची शक्यता आहे. तसे घडल्यास या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ होऊ शकते.

आतापर्यंत होर्डिंगचा 50 टक्के ढिगारा बाजूला करण्यात आला आहे. पूर्ण ढिगारा बाजूला करण्यासाठी आणखी 24 तास लागण्याची शक्यता आहे. सध्या NDRF जवानांची एक तुकडी, अग्निशमन दलाच्या जवान आणि मुंबई महानगरपालिकेची टीम बचाव कार्य करत आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 70 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. आज सकाळी बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशनला पुन्हा सुरुवात केली. त्यावेळी लोखंडी ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या आढळून आल्या. या गाड्यांमध्ये लोक अडकून पडले असण्याची शक्यता आहे. मात्र, या दुर्घटनेला तब्बल 46 तास उलटून गेले आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक अडकून असतील तरी त्यांच्या जिवंत असण्याच्या आशा फार कमी आहेत.