पंचगंगा नदी प्रदूषणाचे पुरावे ६ जूनला उच्च न्यायालयात सादर : दिलीप देसाई

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची दखल घेत कोल्हापूर बरोबरच इचलकरंजी शिरोळ येथे संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर बोलताना उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आजच्या संयुक्त पाहणीमध्ये नदी प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत तयार करण्यात आलेल्या शासकीय अहवालात जे मुद्दे नोंद केले आहेत, ते पुरावे म्हणून उच्च न्यायालयात ६ जून रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाटावर काळे दुर्गंधीयुक्त पाणी येऊन मासे मृत्यूमुखी पडले होते. जयंती नाला कोल्हापूर येथून विनाप्रक्रिया रासायनिक सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबत उच्च न्यायलयात याचिका दाखल केली असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सदर प्रदूषित पाण्याची पाहणी करून नमुने घेण्याची विनंती केली होती.

सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथे नमुने घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात पंचगंगेच्या शेवटच्या टोकावरील हेरवाड बंधाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरभट, त्याचबरोबर नायब तहसीलदार योगेश जमदाडे, याचिकाकर्ते दिलीप देसाई इचलकरंजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी तेरवाड बंधाऱ्यावरून फेसाळलेल्या काळ्यापाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याचबरोबर इचलकरंजीतील काळा ओढा येथेही भेट दिली. तेथील दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याचे नमुने व तेच पाणी उसाच्या शेतीसाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.