राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा होऊन हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सांगली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.