पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत आहेत. त्यानंतर ते निवृत्त होतील, त्यामुळे ते स्वतःसाठी नाही तर अमित शहा यांच्यासाठी मत मागत आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.
तिहार तुरुंगात अनेक दिवस काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत”, असा दावा केजरीवाल यांनी केला. तसेच लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल आणि सप्टेंबर २०२५ नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान होतील, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?”, असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे .