महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी न्याय झाला असून दोन आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर कटाचा आरोपा होता तो वीरेंद्र तावडे मात्र पुराव्याअंभावी निर्दोष सुटला आहे. अन्य दोन आरोपींची सुद्धा निर्दोष सुटका झाली आहे. 11 वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालानंतर दाभोलकर कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं असलं, तरी निर्दोष सुटलेल्या तीन आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्त्येप्रकरणी , पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल होत त्याच्यावर खटला सुरु होता. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मॉर्निंग वॉकला गेले असता सकाळी 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत दुसरी डोक्यात गेली होती. या घटनेनंतर, महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
कारण महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी विचाराच्या राज्यात दिवसा ढवळ्या असा घडलेला हा प्रकार अनेकांना अस्वस्थ करणारा होता. त्यानंतर, कॉम्रेड गोविंद पानसरे , एम.एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेशयांचीही अश्याचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यांच्या हत्येमागेही वीरेंद्र तावडे चा सहभाग असल्याचे समोर आले आहे .