जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला हिरवा कंदील मिळाल्याने कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना लवकरच नेमणुका मिळतील. मात्र, आता भरती झालेल्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, एकाच जिल्ह्यात त्यांना निवृत्त होईपर्यंत ड्यूटी करावी लागणार आहे.
ग्रामविकास विभागातर्फे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच त्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर भरतीला सुरवात
राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास पाच हजार पदे तर खासगी अनुदानित संस्थांमधील पाच हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया २० मेपासून सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मागील भरतीवेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही.
जिल्हा परिषद शाळांवरील बदलीस पात्र शिक्षकांची पदस्थापना व पदोन्नतीची प्रक्रिया सुरवातीला होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर शाळा सुरु होण्यापूर्वी नव्याने भरती झालेल्यांची कागदपत्रे पडताळणी होईल आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्याचे नियोजन आहे.
