“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या वारसाहक्का मुद्दा उकरून काढला. त्यामुळे सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारे आता कोल्हापूरच्या गादीवर बोलू लागले आहेत. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू यांना इशारा देत असताना निवडणूक न लढविण्याची सूचना केली आहे.

कोल्हापूर येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत हसन मुश्रीफ म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जेव्हा ठरत होती, तेव्हाच मी त्यांना निवडणुकीत न उतरण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळा सन्मान आहे. पण राजकारणात उतरल्यानंतर तुम्ही विनाकारण वादात ओढले जाल, असे मी त्यांना सांगितलं होतं. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर नियमाप्रमाणे खेळावेच लागतं. मी आजही म्हणेण, अर्ज भरायला अजून वेळ आहे. त्यामुळे तुमचा सन्मान राखायचा असेल तर तुम्ही फेरविचार करावा. कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला, त्यावर टीका होणे आम्हाला योग्य वाटत नाही.”

शाहू महाराजांचा सन्मान करायचा होता तर मविआने त्यांना राज्यसभेवर घ्यायला हवे होते. आम्ही संभाजीराजेंना राज्यसभेवर घेतले होते. त्यामुळे आता या वादावर पडदा टाकला गेला पाहीजे, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं, त्यातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे, असा प्रचार विरोधक करत आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी धरण बांधलं ते ठिक आहे. पण सदाशिवराव मंडलिक यांनी केलं, तेही कोल्हापूरकरांना माहीती असायला हवं. कोल्हापूरची जनता दूषित पाणी पित होती, त्यासाठी सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून पाणी मिळवून दिले. त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, पण त्यांनी स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यामुळे संजय मंडलिक यांना आपण निवडून दिले पाहीजे, असेही आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.