मुंबई: बुधवारचा दिवस (6 मार्च) मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दिवशी भारतात पहिल्यांदा अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून मेट्रो धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी कोलकात्यात देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या बोगद्याचं उद्घाटन झालं.
भारतात पहिल्यांदाच अंडरवॉटर मेट्रो धावणार असली, तरी इतर काही देशांमध्ये हा प्रयोग यापूर्वीच यशस्वी झालेला आहे. अनेक देशांमध्ये पाण्याखालून ट्रेन धावते. काही देशांमध्ये तर फार पूर्वीपासून पाण्याखालून ट्रेन धावत आहे. यात जपान, तुर्कीसह इतर काही देशांचा समावेश आहे.भारतातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन आज झालं; पण काही देशांमध्ये अंडरवॉटर ट्रेन यशस्वीपणे धावत आहेत. अमेरिकेतल्या बार्ट बोगद्यात पाण्याखालून ट्रेन धावते. ही ट्रेन ऑकलँड ते सॅनफ्रान्सिस्को या मार्गावर धावते. तुर्कीत मारमारय बोगद्यातून अंडरवॉटर ट्रेन धावते. हा मार्ग जगातल्या पाण्याखालच्या सर्वांत मोठ्या रेल्वेमार्गांपैकी एक समजला जातो. स्वीडन आणि डेन्मार्कदरम्यान अंडरवॉटर ट्रेन धावते. ही ट्रेन बाल्टिक समुद्राखालून प्रवास करते.