दिल्ली : संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्याममता बॅनर्जी सरकारला सुनावले. याच भूमीवर टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. संदेशखालीत जे काही घडले, ते पाहून कुणाचीही मान शरमेने खाली झुकेल. पण इथल्या सरकारला काहीही फरक पडत नाही. बंगाल सरकार आरोपींना वाचवण्यासाठी सर्वप्रकारच्या बळाचा वापर करताना दिसत आहे, असे टीकास्त्रही मोदींनी सोडले.
ममता बॅनर्जींच्या राजवटीत घोर पाप झाले आहे. टीएमसीचे नेते ठिकठिकाणी महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार करत आहेत. अशी प्रकरणे घडत असताना, तृणमूल काँग्रेसचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, पण माता-भगिनींवर विश्वास नाही. त्यामुळेच येथील माता-भगिनींमध्ये प्रचंड रोष आहे. टीएमसीची माफिया राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यातील माता-भगिनी आता पुढे सरसावल्या आहेत. टीएमसी सरकार कधीही महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही अशी भावना आता त्यांच्यातही जागृत झाली आहे. त्यामुळे त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी माता-भगिनीच त्यांना धडा शिकवतील,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारला इशारा दिला.