कोल्हापूर प्रतिनिधी:
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना जिल्ह्यात वेग आला असताना कोल्हापूर दौऱ्यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची त्यांच्या नवीन राजवाड्यात भेट घेतली. यावेळी महाराज आणि पवार यांच्यात बंद खोलीत तासभर चर्चा झाली.
या घडामोडीमुळे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता झाली आहे. दरम्यान आज रात्री माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आम. सतेज पाटील यांच्या निवासस्थानी पवार स्नेह भोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोल्हापूर च्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत चर्चा होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री पवार हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कोल्हापूर
दौऱ्यावर आले आहेत. लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर त्यांचा हा दौरा राजकीय लक्षवेधी ठरत आहे.
कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीची घोषणा महायुतीने नुकतीच केली आहे.
यांना शह देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ,शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी व्यूहरचना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची घेतलेली भेट उमेदवारीची संकेत देणारी ठरत आहे. शरद पवारांचा कोल्हापूरात आज मुक्काम असून यावेळी बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.