कागल: सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची (कोचिंग क्लास ) गरज आहे. राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीतून विद्यार्थ्यांना दर्जेदार व चांगले मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे भविष्यात या अकॅडमीतून मोठे अधिकारी घडतील, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल व राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनवेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, कागल तालुक्यातील किंबहुना ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या पदावर जावेत, मोठे अधिकारी व्हावेत हे स्व. राजेसाहेबांचे स्वप्न होते.स्व.राजेसाहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे.या उद्देशाने कागल येथे चांगल्या शिक्षण संकुलची स्थापना केली. या अकॅडमीतून नीट, जेईई, एनडीए, सीईटी अशा विविध परीक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे .यामध्ये आणखी भर घालण्याचे आमचा प्रयत्न राहणार आहेटीएनसीचे चेअरमन प्रा. तानाजी चव्हाण म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरली. त्यांना योग्य मार्गदर्शन,दर्जेदार शिक्षण व दिशा देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्याचाच परिपाक म्हणून या शिक्षण संकुलाकडे पहावे लागेल. या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांचा उपयोग करून घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तम करिअर घडवावे.व्यासपिठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक सचिन मगदूम, संजय नरके,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सहसचिव,टी.जी.आवटे,विजय बोंगाळे,युवराज पसारे,प्रशासन अधिकारी,कर्नल(नि )एम.व्ही.वेस्वीकर, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण,पी.जी.मगदूम आदी उपस्थित होते.स्वागत मुख्याध्यापक शिवाजी खोत यांनी केले.आभार जयश्री पाटील यांनी मानले.
स्पर्धा स्वतःशीच करा…
अपयशाने खचू नका
विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे नोकरी अथवा व्यवसाय करावा.पालकांनीही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अपयश आले तरी खचून न जाता यश मिळेपर्यंत पुन्हा प्रयत्न करावेत.मात्र हे करत असताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका. स्वतःशीच स्पर्धा करून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळवा.असा कानमंत्र श्री घाटगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.