मुंबई: क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली असून टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार दत्ता गायकवाड यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. दत्ता गायकवाड यांनी वयाच्या 95 व्या वर्षी बडोद्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
दत्ता गायकवाड हे टीम इंडियाचे सर्वात वयस्कर खेळाडू होते. तसेच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ता गायकवाड यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक आजी माजी खेळाडूंना सोशल मीडियाद्वारे दत्ता गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. गायकवाड यांनी कसोटी कारकीर्दीत 1952 ते 1961 या दरम्यान 11 सामन्यांमध्ये 350 धावा केल्या होत्या. गायकवाड यांनी 1959 साली इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियांची कॅप्टन्सी केली होती. दत्ताजीराव यांनी क्रिकेटचा वारसा आपल्या मुलाला दिला. दत्ताजीराव यांचा मुलगा अंशुमन गायकवाड यांनीही 1975 ते 1987 दरम्यान 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.