अब्दुल सत्तार पुढच्या चार महिन्यात जेलमध्ये असतील: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करत अब्दुल सत्तार पुढच्या चार महिन्यात जेलमध्ये असतील, असा खळबळजनक दावा केला.

अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपले सरकार येईल आणि कमीत कमी 12 महिने सत्तार जेलमध्ये असतील”, असं संजय राऊतांनी म्हटलं. अब्दुल सत्तार हे त्यांच्या विधानामुळे नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वीच सत्तार यांच्या विरोधात पाच फौजदारी तक्रारी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच सत्तार पुढच्या चार महिन्यात जेलमध्ये असतील, या राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.