लातूर – पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्यानं गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बकऱ्याचा बळी दिल्याचा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळं खळबळ माजलीय. वर्षभरापूर्वी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा एका अधिकाऱ्यानं पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हांचं प्रमाण वाढलं. यावर उपाय म्हणून बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना त्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून बाहेर आली. त्यानं ठाण्यातीलच दुसऱ्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार त्या अधिकाऱ्यानं एक बोकड आणि कसाई यांना आणून पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकड कापण्यात आलं. जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीसच अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती कशी होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या प्रकरणातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केलीय.