शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आल्याने महायुतीत संशयकल्लोळ 

मुंबई: मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर ‘ओबीसीं’च्या बाजूने किल्ला लढवून वादग्रस्त बनलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे महायुतीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांमुळे ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असतानाच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आल्याने महायुतीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

आपल्याला कोणतीही ऑफर नसल्याचे सांगत भुजबळ यांनी भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे. मात्र भुजबळांच्या भाजप प्रवेशाची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळली नसल्याने संभ्रम कायम आहे.

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर ओबीसी समाजाकडून त्याला प्रतिक्रिया देण्यात येऊ लागली. ओबीसी घटकांचे नेतृत्व स्वीकारून छगन भुजबळ यांनी एकहाती किल्ला लढविला. मंत्रिपदावर असतानाही भुजबळ सरकारच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन बोलत असल्यामुळे सरकारमध्ये आणि महायुतीमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. 

हा विषय संवेदनशील बनल्यामुळे महायुतीतील सगळेच पक्ष भुजबळांची वक्तव्ये ही त्यांची व्यक्तिगत असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत होते. अर्थमंत्री अजित पवारसुद्धा त्यामुळे अस्वस्थ असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होत होते. तशातच गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी फडणवीस यांच्याकडे दर्शविल्याची चर्चा आहे.

दमानियांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण-

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी ट्विट करून भुजबळांच्या भाजप प्रवेशासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.” एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका दाखल करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनविणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार.. राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?” असे ट्विट करून दमानिया यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत. अलीकडच्या काळात दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर पुन्हा दमानिया यांनी ट्विट करून, ‘ज्यांच्याविरुद्ध लढलो, ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी देवेंद्र फडणवीस नाही,’ असे प्रत्त्युत्तर दिले.

गायकवाडांकडून निशाणा-

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे वक्तव्य केले होते. त्याबरोबरच गायकवाड यांनी एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना भुजबळांचे नाव घेऊन शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. यावर भुजबळ यांनी गायकवाड यांच्या भाषेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून, तुम्ही ज्या शिवसेनेच्या शैक्षणिक संस्थेत शिकत आहात. त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरा, असा सल्ला दिला आहे. 

शिरसाटांचीही भुजबळांवर टीका-

संजय गायकवाड यांच्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी मीही जुना शिवसैनिक असून आनंद दिघे यांचा सहकारी असल्याची आठवण करून दिली होती. ”माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे. तसा तो आमदारांनाही आहेच त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही पण संजय गायकवाड यांनी राजीनामा मागताना जी भाषा वापरली ती बरोबर नाही,” असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मला कुणीतरी सांगितले होते की भुजबळांना भाजप ओबीसी चेहरा बनविणार आहेत. फक्त राज्यातच नाही तर देशभरात त्यांना तसे प्रमोट केले जाणार आहे. मंडल आयोगाच्या लढ्याच्या वेळी भुजबळांनी दिलेले योगदान खूपच मोठे होते. त्यामुळे भुजबळांना पुन्हा तसेच करायचे आहे असे भाजपने ठरविले आहे. मला जेव्हा हे पुन्हा कळले तेव्हा फार विचित्र वाटले. अजित पवार व त्यांच्याबरोबर पूर्ण फौज भाजपने सोबत घेतली. या सगळ्या रथी-महारथींना भाजपाने सोबत घेतले आहे. त्यात आता भुजबळांना थेट पक्षातच घेतले जाणार असल्याचे कळल्यावर फार विचित्र वाटले.