कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत खूप मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पण हे सर्व घडत असताना संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी एक अट असणार आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. संभाजीराजेंनी 3 पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्याबाबत एकमत झालेलं आहे. पण महाविकास आघाडीने यासाठी संभाजीराजे यांच्यापुढे ठेवलेली अट मोठी आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीच्या ऑफरवर काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
संभाजीराजे यांनी आता महाविकास आघाडीमध्ये त्यांचा स्वराज्य पक्ष पक्षात विलीन केला तर त्यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते, महाविकास आघाडीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचदेखील याबाबत एकमत झालेलं आहे. संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा दिली जाऊ शकते, अशीदेखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचंदेखील नाव यासाठी चर्चेत होतं. संभाजीराजे याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.