सीमा भागातील शेतकऱ्यांसह मंत्री गडकरींना भेटू : राजे समरजितसिंह घाटगे..

कागल (प्रतिनिधी) : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा-यमगर्णी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिलरच्या पुलाप्रमाणे व्हावा.अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक नेते व शेतकऱ्यांसह यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा भेट घेऊ.कोणत्याही परिस्थितीत भरावाऐवजी पिलरचा पुल करण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राहू.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

कागल येथे कर्नाटकातील शेतकऱ्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेतली व भरावाचा पूल रद्द करून त्या ऐवजी पीलरचा पूल करण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत साकडे घातले.यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व शाहू साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, याआधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पंधरा दिवसांपुर्वी मंत्री गडकरी यांना दिल्ली येथे भेटून पत्र दिले.त्याची दखल घेत त्यांनी एनएचएआयच्या सेक्रेटरींकडून कागलमधील पिलरच्या उड्डाण पुलाप्रमाणेच वेदगंगा नदीवरील हा पूल उभा करण्याबाबत कर्नाटकातील रिजनल ऑफिसर ब्रह्मानंद यांना सुचना द्या.असा आदेश दिला. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले भरावाच्या पुलाचे काम सध्या बंद केले आहे.माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक लोप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनरेटा लावावा. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, काम सुरु असलेला हा पुल नसताना याआधी अनेक वेळा वेदगंगेला आलेल्या महापुराचे पाणी महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहत होते. यामुळे महामार्गावरील वाहतूकही बंद झाली होती.

महामार्ग बनविताना केलेल्या भरावामुळे पश्चिम भागात पाण्याचा फुगवटा होऊन घरांसह शेतीचे नुकसान झाले होते.या पुलासाठीच्या भरावामुळे पावसाळ्यात नजीकच्या वेदगंगा नदीच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होऊन पुर्वीपेक्षा महापुराची भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सीमा भागातील निपाणी व कागल तालुक्यातील गावांना शेती व नागरी वस्तीस याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे या कामी राजे समरजितसिंह घाटगे यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने के.डी.पाटील (कुर्ली)यांनी मनोगत व्यक्त केले.चौकट*पुलास नव्हे,पूलाच्या कामाच्या पद्धतीस विरोध* केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना मागील आठवड्यात कागलमध्ये शेतकऱ्यांनी या पुलाबाबत निवेदन दिले.त्यांनीसुद्धा याची तातडीने दखल घेऊन मंत्री गडकरी यांना पत्र दिले. मंत्री महोदयांना या पूलाच्या कामास शेतकऱ्यांचा विरोध नाही तर कामाच्या पद्धतीस विरोध असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे ते यासाठी सकारात्मक आहेत,अशी माहिती राजे समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी दिली.