भीमा कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी…

कोल्हापूर(प्रतिनिधी) : देश आर्थिक सत्ता बनवायचा आहे. त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी मेरी वेदर मैदान येथे आयोजित, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी काढले. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक,भागीरथी संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ.रुपाराणी निकम, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले, राहुल चिकोडे, जयंत पाटील, सत्यजीत कदम आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. हसन मुश्रीफ यांनी भीमा कृषी प्रदर्शनाची गरज आणि उपयुक्तता स्पष्ट केली. यंदा कोल्हापूर जिल्ह्यात ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तरीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी, राधानगरी धरण उभारले आणि कोल्हापूरला चिंतामुक्त केले. या पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून जास्तीचे उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्रयत्नशील रहावे व एकरी उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचे, नामदार मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणीसाठा भरपूर आहे. या पाण्याचा वापर करून आणि नव तंत्रज्ञान आत्मसात करून, तरुणांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतीचे तुकडे होत आहेत. उत्पादन घेण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. अशावेळी तरुणांनी शेती अभ्यासावर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे खासदार मंडलिक म्हणाले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले शेती हा भविष्यामध्ये एक नंबरचा व्यवसाय राहणार आहे, हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आता नव तंत्रज्ञान आणि शेतीमधील प्रयोग करणे क्रमप्राप्त आहे, असे नमूद केले. आज शेतकऱ्यांची मुले शेतीऐवजी दुसरे क्षेत्र निवडत आहेत. त्यांना पुन्हा शेतीच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. जमीन हवी, मात्र शेतकरी मुलगा लग्नासाठी नको, अशी मानसिकता तयार होत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आपल्या प्रास्तविक पर मनोगतात, खासदार धनंजय महाडिक शेती व्यवसायाची सद्यस्थिती स्पष्ट केली. शेती निसर्गावर अवलंबून आहे. तरी नवीन ज्ञान – तंत्रज्ञान, मशिनरी यंत्रे यांची माहिती भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते. याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

गोलू २ रेडा हा यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.त्याचबरोबर या प्रदर्शनात अन्य काही जातिवंत जनावरे आणण्यात आली आहेत. ते पाहून शेतकऱ्यांनी आपल्या जनावराचे अधिक चांगले पालन करावे आणि गोलू ३ आपल्याकडे निर्माण करावा, असा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे सांगितले.

शेती बरोबरच शेतकऱ्यांनी मत्स्य पालन,रेशीम उद्योग,बांबू उद्योग असे जोडधंदे शेतकऱ्यांनी सुरू करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी शेतकऱ्याला सहा हजार रुपये अनुदान वर्षाला दिले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वागत कृष्णराज महाडिक यांनी केले. तर आभार भीमा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विश्र्वराज महाडिक यांनी मानले.

मेरी वेदर मैदानावर गोलू २ आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी झाली होती. आज पहिल्याच दिवशी तांदूळ ,सेंद्रिय गूळ,हळद,नाचणी,शेतीची अवजारे यासह अन्य साहित्य याची मोठी विक्री झाली. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले.