गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान : देवेंद्र फडणवीस

मुंबई: अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे . समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जाऊया , असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहात राम लला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, शैलेश जोगळेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, शाम पत्तरकीने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते.भारतीय इतिहासात २२ जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला.

राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदिर पूर्ण झाले आहे.कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्थापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनीय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आजभव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. त्यामुळे राम ललाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी रामनगर येथील मंदिराला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राम ललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी या परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. 

यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय मोर्चा तसेच औषधी विक्रेता संघ व विविध सामाजिक संस्थांतर्फे करण्यात आला होता. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य करुन राम जन्मभूमीउत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.