करवीर तालुक्यात पोलिसांच्या कृपेमुळे अवैध धंद्यांना ऊत…

कुडीत्रे :(प्रतिनिधी) : ऑनलाईन मार्केटिंग, शेअर बाजार व खाजगी सावकारी सध्या या अवैध व्यवसायांनी समाजात थैमान घातले आहे. त्यामुळे समाजातील अनेक सर्वसामान्य तसेच  शेती पूरक व्यवसाय व अन्य व्यवसायाने कर्जबाजारी झालेले लोक अवैध गोष्टींकडे धाव घेत आहेत. 

   अनेकजण सावकारी पाशात अडकत आहेत. पण पोलीस त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत त्यामुळे दोनवडे (ता. करवीर) येथे झालेली गोळीबाराची घटना असे गंभीर गुन्हे होत आहेत. पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगार सरेआम गुन्हे करत फिरत आहेत.

          साखळी फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेअर्स कंपन्या मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. कित्येक लोकांचे पैसे यामध्ये अडकले आहेत. यामध्ये सुशिक्षित लोक, राजकीय नेत्यांची मुले ही अडकली आहेत. त्यामुळे दहा टक्के व्याज दराने हे सर्वजण सावकारकीचा आधार घेत आहेत.कोणतीही नोकरी व्यवसाय नसल्याने या मुलांची लग्न होत नाहीत अशी निराशा व वैफल्यग्रस्त झालेली मुले गुंडगिरीचा आश्रय घेत आहेत.  यातून गंभीर गुन्हे व खुनासारखे प्रकार घडत आहेत. शहराप्रमाणेच त्याचे लोन ग्रामीण भागात पसरल्याने लोक चिंताग्रस्त झाले आहेत.

         लोकांनी यावर तक्रारी केल्यास राजकीय लोक व पोलीस तडजोड करतात व कारवाई होत नाही. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची मुलेही  अडकली आहेत त्यामुळे त्यांना अभय मिळत आहे. यामध्ये अनेकजण व्यसनाधीन झाले आहेत. सावकाराच्या तडाख्यात सापडले आहेत. निवडणुका आल्या की राजकीय लोक यांचा फायदा घेतात व त्यांचा वापर निवडणुकीसाठी करतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागात अशा टोळ्या निर्माण  झाल्या आहेत. पोलीस खात्याला याचा ताप झाला आहे पण पोलीसही चिरीमिरी घेऊन वाटावाटी करत आहेत व अप्रत्यक्षपणे याला पाठिंबा देत आहेत. यामुळे अवैध धंदे व गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.