गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाची सुरवात करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या रस्त्याची लांबी 37 किलोमीटर आहे. हा रस्ता भुदरगड तालुक्यातील अनेक गावांतून जातो. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी व पर्यटकांसह अनेकांची आहे. सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात गोव्याला जाणारे पर्यटक व गोवा भागातून बाळूमामा देवस्थानच्या दर्शनासाठी या रस्त्यावरून जात असून हा रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. हा रस्त्या पुर्ण झाल्यानंतर आणखी पर्यटकांची संख्या वाढणार असून यामुळे याभागातील नागरीकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गाला, विद्यार्थ्यांना तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे सोपे होईल. त्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.
याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे.
