कोल्हापूर प्रतिनिधी :आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उमेदवारी निश्चित करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपारिक विरोधक माजी खासदार राजू शेट्टी यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याबाबत महाविकास आघाडीच्या बहुतांश नेत्यांचे एकमत झाले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी रॅली काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज उठवला आहे तसेच हातकणंगले मतदारसंघातून जणसंपर्क देखील वाढवला आहे तर खासदार धैर्यशील विकास कामांचा धडाका लावला आहे तसेच त्यांना या मतदारसंघातून आवाडे गटाची रसद मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. माने यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरू असून त्यांच्या कोट्यातून शेट्टींना उमेदवारी देण्याबाबत नेत्यांचे एकमत झाले असल्याचे वृत्त आहे