दोनवडेच्या लॉजिंग मालकाचा गोळ्या गालून खून

कुडित्रे (प्रतिनिधी) : दोनवडे येथे लाँज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाला आहे. चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५० ) रा. दोनवडे (ता.करवीर) असे लॉज मालकाचे नाव आहे. तर सचिन शामराव जाधव (वय ४०) व दत्तात्रय कृष्णात पाटील (वय ३८ दोघेही रा. खुपीरे ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी घटनेनंतर करवीर पोलिसांत हजर झाले आहेत. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा येथे चंद्रकांत पाटील यांचे गोल्डन लॉज आहे.आज रात्री साडेसात आठच्या सुमारास दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे चंद्रकांत पाटील यांच्या लॉजवर आले.यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यातून झटापट सुरू झाली.चंद्रकांत पाटील यांच्यावर यातील एकाने गावठी कट्ट्यातून एक गोळी थेट चंद्रकांत यांच्या छातीवर झाडली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश तेथे गोळीबाराचा आवाज ऐकून धावत आला.रितेशला पाहून आरोपी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव निघून गेले.

 चंद्रकांत यांना गंभीर जखमी आवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.