जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर( प्रतिनिधी)जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित व शास्वत पाणीपुरवठा करणे प्रमुख उद्दिष्ट असून जल जीवन मिशनचा पाणी गुणवत्ता हा अविभाज्य घटक आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनतर्फे जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन आज ( बुधवार) 10 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील होते.
या कार्यशाळेसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत सांडपाणी मिसळत असल्यामुळे पाणी दुषित होताना दिसून येते. यासाठी वर्षातून दोनपेक्षा जास्त वेळा पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे गरजेचे असून गेल्या पाच वर्षांत वारंवार दुषित आलेले स्त्रोतांची यादी तयार करणेबाबत तसेच जे स्त्रोत कायमस्वरूपी बंद झालेले आहेत ते स्त्रोत केंद्रशासनाच्या संकेतस्थळावरून कमी करणेच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिल्या.

कार्यशाळेचे प्रास्तविक जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी केले. या कार्यशाळेसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीप्रसाद बारटके, अति. आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व तालुकयातून गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता व शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, विस्तार अधिकारी, (पंचायत , आरोग्य ) उपस्थित होते. तसेच, भु-जल सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी, पाणी तपासणी प्रयोगशाळेचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.

जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण मार्गदर्शक सूचना, जलसुरक्षकाचा शासन निर्णय, FTK तपासणी बाबतचा शासन निर्णय, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय इ बाबींवर या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. याच पध्दतीने तालुकास्तरावर 15 ते 22 जानेवारी अखेर पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यशाळेसाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, वैद्किय अधिकारी प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार आहेत. पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आता जिल्हयातील प्रत्येक गावाला पाणी तपासणी संच (FTK) जिल्हास्तरावरून दिला जाणार आहे त्यामुळे आता गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.