मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात सुरु असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 10 जानेवारी रोजी निकाल देणार आहेत.मात्र या निकालापूर्वी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ठाकरे गटाकडून आक्षेप नोंदवला जात आहे. असं असतानाच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यावर आक्षेप घेतला आहे.
संशयाला जागा
पत्रकारांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील विषयावरुन नार्वेकर आणि शिंदेंची निकालाआधी भेट झाल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी, “साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या बाबत केस आहे आणि जे निर्णय घेणार आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाणं यामुळे संशयाला जागा आहेत,” असं म्हटलं.
फडणवीस यांचाही केला उल्लेख
राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा संदर्भ देत बोलताना, “पदाचा मान राखण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष यांच्यावर आहे,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, “देवेंद्र फडणवीस यांना कदाचीत उद्याच्या निकालाबाबत माहिती आसावी,” असंही सूचक विधान केलं.
राष्ट्रवादीच्या निकालाबद्दल काय बोलले
राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाबाबतच्या वादावर बोलताना शरद पवारांनी, “दोन्हीकडून बाजू मांडून झाल्या आहेत. पण निर्णय अद्याप आलेला नाही. आम्ही निकालाची वाट बघतोय,” असं सांगितलं.
परतीची दारं बंद
परतीसाठीचे दरवाजे प्रमुख नेत्यांसाठी बंद आहेत, असं शरद पवार यांनी अजित पवारांसाठी परतीचे दोर कापले गेल्याचं सांगत केलं. तसेच शिवसेनेतील वादासंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल आल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असंही शरद पवार म्हणाले.
वयावरुन होणाऱ्या टीकेवरुन टोला
अजित पवारांकडून सातत्याने वयावरुन टीका होत असल्याच्या संदर्भातून बोलताना शरद पवारांनी, “प्रश्न वयाचा असेल तर खूप उदाहरण सांगता येतील. पण यावर जास्त काही बोलणार नाही. याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्याला नजर आंदाज करणे चांगले, असं उत्तर दिलं. “1967 पासून मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही,” असंही शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीत वाद आहे का?
इंडिया आघाडीमध्ये वाद आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी, काहीही झाले तर मिळून जाणार आणि मार्ग काढणार, असा निर्धार व्यक्त केला.
ईडी छाप्यावर काय बोलले?
उद्धव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, “जोपर्यंत दिल्लीचे सरकार बसत नाहीत तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार,” असं म्हटलं आहे.
“ईव्हीएमबाबतचा प्रस्ताव आम्ही निवडणूक आयोगाला पाठवला आहे. पण निवडणूक आयोगाने वेळ देणे किंवा चर्चा करणे या दोन्हीही गोष्टी मान्य केलेल्या नाहीत. जयराम रमेश यांनी 12 पाणी पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे,” असं शरद पवार म्हणाले.