शाहूपुरी पोलिसांकडून 4 लाख 79 हजाराची चोरी उघड ; एक जण ताब्यात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापुरातील उच्चभ्रू ताराबाई पार्क येथील हिम्मत बहादुर परिसरात सेवानिवृत्त अधिकारी मधुकर बापू वाघमारे यांच्या घरी झालेल्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी शुभम उर्फ साहिल कांबळे याला शाहूपुरी पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी शुभमकडून तब्बल साडेसात तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,मूळचा कसबा बावडा येथील दत्त गल्लीत राहणारा शुभम उर्फ साहिल कांबळे हा वाघमारे यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून कामगार म्हणून काम करत होता.त्यांना शुभमवर प्रचंड विश्वास होता. हेच निमित्त साधून शुभम ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 या काळात वाघमारे घरी नसल्याचे बघून घरातील तिजोरीतून दागिने लंपास करायचा.मात्र सारखे दागिने लंपास होत असल्याची बाब वाघमारे यांना लक्षात येताच त्यांनी घरातील तिजोरी असणाऱ्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी कामगार शुभम हा दागिने चोरताना सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी वाघमारे यांनी शुभम उर्फ साहिल विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाची दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी शुभम उर्फ साहिलला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 4 लाख 79 हजार रुपयांचे साडेसात तोळे दागिने हस्तगत केले आहेत.

ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम कोल्हाळ, स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, विकास चौगुले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.