शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून हकालपट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यास व त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.जाधव हे गेली 30 वर्षे शिवसेनेत सक्रिय होते. शहरप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुख या पदावर त्यांनी काम केले आहे. गेली १९ वर्षे ते जिल्हाप्रमुख होते.

दोन दिवसापूर्वी माजी खासदार शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शेट्टी हे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. ठाकरे यांनी उमेदवारीला पाठिंबा द्यावा यासाठी शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली असल्याची राजकीय चर्चा आहे.

शेट्टी यांनी ठाकरे यांची भेट घेतल्यावर जिल्हाप्रमुख जाधव यांनी, ‘उसन्या उमेदवाराला तिकीट देऊ नका. निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी द्या. शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांनी यापूर्वीही शिवसेनला फसविले आहे.’अशी टीका केली होती. हेच जाधव यांना भोवल असावं. जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर वैभव उगले व संजय चौगुले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🤙 8080365706