कोल्हापूर (प्रतिनिधी) भाविक जनतेची अस्मिताचिन्हे असलेल्या तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांच्या विकासाबरोबरच केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील गावागावात ‘जन आरोग्य मंदिरे’ उभारण्याचे ठरविले आहे. ‘हेल्दी नेशन-वेल्दी नेशन’ या संकल्पाद्वारे देशभर अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या संकल्पातून नव्या वर्षात आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भरतेची व्यापक मोहिम केंद्र सरकार राबविणार आहे. असे भाजपकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
देशातील कोणताही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये याकरिता १.८० लाख गावांमध्ये ‘जन आरोग्य मंदिरे’ बांधण्यात येत असून १.३७ लाख केंद्रांमध्ये उपचार सुविधा सुरू देखील झाल्या आहेत. पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळण्यासाठी गरजू नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्यात येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १ कोटींहून अधिक नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘फिट इंडिया’ चळवळीत अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून देशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यपूर्ण जीवनशैली चे महत्व पटवून देण्यात ही चळवळ यशस्वी ठरत आहे. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारतातील प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न असावे याकरिता सर्व आरोग्य विषयक मोहिमा जनआंदोलनांच्या माध्यमातून जोमाने चालविल्या जाव्यात, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रोत्साहनपर कार्यक्रम आखत असते.
टीबीमुक्त भारत मोहिमेची पाळेमुळे देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहेत, तर विशेषतः मध्य भारतात अधिक प्रमाणात असलेल्या सिकलसेल एनिमिया या अनुवंशिक आजाराचा पुढच्या पिढीला सोसावा लागणारा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सिकलसेल एनिमिया निर्मूलन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत साडेसात कोटी लोकसंख्येची आरोग्यविषय़क माहिती संकलित करण्यात आली आहे.
१९५६ मध्ये या अनुवंशिक आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले गेलेच नव्हते. मोदी सरकारने या आजाराच्या उच्चाटनास प्राधान्य दिले असून ईशान्येकडील शहडोलसारख्या एका सुदूर जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
‘
स्वस्थ भारत विकसित भारत’ संकल्प साकार करण्यासाठी आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, जनऔषधी केंद्रे, फिट इंडिया चळवळ, सिकलसेल एनिमिया मुक्ती अभियान, पोषण आहार अभियान अशा अनेक योजना देशात राबविल्या जात असून २०४७ पर्यंतच्या अमृतकाळातील आत्मनिर्भर भारताचा स्वास्थ्य आणि संपन्नतेचा संकल्पदेखील साकार झालेला असेल, असा भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे.
