कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महापालिकेला रस्ते विकासाकरिता शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी ठेकेदाराच्या रस्ते कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली.
रस्ते तयार झाल्यानंतर चार-पाच महिन्यातच रस्ते खराब होतात. डीएलपी मध्ये असलेल्या रस्त्यांची देखील अवस्था दयनीय आहे. त्यामुळे दर्जेदार रस्ते होणे गरजेचे आहे.
गुणवत्तापूर्ण रस्ते तयार होण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली रस्ते दक्षता समिती स्थापन करावी. या समितीमध्ये शहरातील सिव्हिल इंजिनीयर, आर्किटेक्ट व नागरिक यांचा समावेश करावा.
रस्ते विकासात चालणारे कमिशन व टक्केवारी नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. याआधीही कंत्राटदारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर याबाबत तक्रारी झाल्या आहेत, लोकप्रतिनधींकडून देखील याचे आरोप प्रत्यारोप होत असतात, वर्तमनपत्राद्वारे देखील याचा जाहिर उल्लेख होत असतो, रस्त्याच्या कामांमध्ये होत असणारी टक्केवारी ही गंभीर बाब असून, याचा थेट परिणाम रस्त्याच्या दर्जा वर होत आहे. अशाप्रकारची कमिशनखोरी थांबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याचा ऍक्शन प्लॅन नागरिकांना जाहीर करण्यात यावा अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
तरी या मागण्यांची दखल घेऊन चार दिवसात कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आप ने दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, मयूर भोसले आदी उपस्थित होते.