कोल्हापूर(प्रतिनिधी) यश मिळवण्यासाठी अचानक केलेले प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे असे मत वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी व्यक्त केले. येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये पाटणकर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बी. एन. पाटणकर ट्रस्टच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सिध्दार्थ पाटणकर, नकुल पाटणकर, संस्थेचे विश्वस्त व सचिव एन. एल. ठाकुर, मुख्याध्यापक एस. डी. पुजारी, मराठी शाखेचे मुख्याध्यापक पी.जे. बामणे, अभिनव बालकच्या मुख्याध्यापिका ए. पी. नवाळे, विद्यार्थी प्रतिनिधी मोहित मोरे, संगमेश शिरगावे, श्रुती केसरकर, पूर्वा आरंडे यांची उपस्थिती होती.
समीर देशपांडे म्हणाले, डाॅ. जे. पी. नाईक, मृत्युंजकार शिवाजीराव सावंत, सिम्बायोसिसचे डाॅ. शां. ब. मुजुमदार, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारख्या अनेकांनी कोल्हापूरचे नाव उज्वल केले आहे. याच पध्दतीने कर्तबगारी गाजवण्यासाठी आतापासूनच चांगल्या सवयी लावून घेण्याच गरज आहे. एच. आर. सत्रे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वर्षभरात विविध परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.