कोल्हापूर: कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे गांधीनगर आणि परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मजुरी,नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून अनेकजण गांधीनगरशी संबंधित आहेत.
गांधीनगर आणि परिसराच्या आरोग्य सेवेसाठी गांधीनगर मध्ये वसाहत रुग्णालय कार्यरत आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाते पण सध्या हे वसाहत रुग्णालयच आजारी अवस्थेत आहे. रुग्णालयाची इमारत जुनी झाल्यामुळे मोडकळीस आली आहे.
ठिकठिकाणी पडझड झाली असून पावसाळ्यामध्ये या इमारतीची अवस्था दयनीय बनते. 50 बेडची मान्यता असली तरी अपुऱ्या जागेमुळे केवळ 30 बेड्स येथे उपलब्ध आहेत. रुग्णांना शौचालयांचीही सोय उपलब्ध नाही.
त्याचबरोबर या वसाहत रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या निवासस्थानांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. जुन्या काळातील घरे असल्यामुळे तडा गेलेल्या भिंती, फुटलेली कौले, उखडलेल्या फरशा असे विदारक चित्र पाहायला मिळते. नाईलाजाने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या घरांमध्ये राहावे लागते.
तसेच वसाहत रुग्णालयात जागे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वसाहत रुग्णालय आणि कर्मचारी निवासस्थानांची नव्याने उभारणी करण्याची मागणी होत आहे. ही बाब कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या निदर्शनास माजी आमदार अमल महाडिक यांनी आणून दिली. गांधीनगर वसाहत रुग्णालयाची होणारी परवड थांबवावी अशी आग्रही मागणी महाडिक यांनी केली. भविष्यात जर हे वसाहत रुग्णालय बंद पडले तर इथल्या नागरिकांना सीपीआर शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे तातडीने सुविधांची पूर्तता करून गांधीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती महाडिक यांनी केली.
या पत्राची दाखल घेत नामदार सावंत यांनी गांधीनगर वसाहत रुग्णालय आणि कर्मचारी निवासस्थान प्रश्नी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. नवीन रुग्णालय इमारतीसह सुसज्ज स्त्री व पुरुष वॉर्ड, शौचालय आणि इतर सुविधा उपलब्ध झाल्यास गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला गांधीनगर वसाहत रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.
